शब्दसिध्दी (Shabd Siddhi) - Word Formation

शब्दसिद्धी (Shabd Siddhi)

आपल्या भाषेतील शब्दसंपत्ती (Vocabulary in Our Language)

  • आपल्या भावना, विचार व्यक्त करण्यासाठी वाक्यात वापरले जाणारे शब्द म्हणजे आपली मूळ मराठी भाषा होय.
  • भाषेचा व्यवहार शब्दांच्या साहाय्याने होतो.
  • सुरुवातीला कमी शब्द असतात, म्हणून नवनवीन शब्द बनवले जातात.
  • इतर भाषांमधून शब्द घेऊन भाषेचा व्यवहार वाढवतात.
  • शेजारच्या प्रांतातील लोकांशी दळणवळण वाढल्याने शब्दांची देवाणघेवाण होते.
  • कालांतराने परभाषीय शब्द आपल्या भाषेत समाविष्ट होतात.
  • भाषेतील मूळ शब्द, इतर भाषांतून घेतलेले शब्द, केलेले बदल आणि शब्द कसा बनवला जातो हे पाहणे मनोरंजक आहे.
  • शब्दसिद्धी: शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.
  • मराठी भाषा संस्कृत-प्राकृत भाषांपासून बनली आहे, त्यामुळे त्या भाषांतील शब्दांचा मोठा भाग मराठीत आहे.

शब्दांचे प्रकार (Types of Words)

1. तत्सम शब्द (Tatsam Words)

  • तत्सम: संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेले शब्द, म्हणजे ज्यांच्या रूपात कोणताही बदल होत नाही.
  • उदाहरण: 'कवि, मधु, गुरू, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव'.
  • आणखी तत्सम शब्द: पुष्प, जल, प्रीति, भीति, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामति, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नि, नदी, कमल इत्यादी.

2. तद्भव शब्द (Tadbhav Words)

  • तद्भव: संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, त्यांना तद्भव शब्द म्हणतात.
  • उदाहरण: कर्ण → कान, चक्र → चाक, अग्नि → आग, पर्ण → पान, विनती → विनंती.
  • आणखी तद्भव शब्द: घर (गृह), पाय (पद), भाऊ (भ्रातृ), सासू (श्वसृ), सासरा (श्वशुर), गाव (ग्राम), दूध (दुग्ध), घास (ग्रास), कोवळा (कोमल), ओठ (ओष्ठ), काम (कर्म), घाम (धर्म) इत्यादी.
  • तत्सम आणि तद्भव शब्द एकाच वेळी वापरले जातात.
  • तत्सम आणि तद्भव शब्दांमध्ये अर्थबदलही होतो.
    • कलश (तत्सम) → कळस (देवळाच्या वरचा भाग - तद्भव)
    • कष्ट (तत्सम) → किळस (घाण - तद्भव)

3. देशी / देशज शब्द (Deshi / Deshaj Words)

  • देशी / देशज: जे शब्द तत्सम, तद्भव किंवा परभाषीय नाहीत, ते महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेतील असावेत.
  • या शब्दांची व्युत्पत्ती मिळत नाही.
  • उदाहरण: झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड.
  • आणखी देशी शब्द: पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, तुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर इत्यादी.

4. परभाषीय शब्द (Parbhashiy Words)

  • शब्दसिद्धीचा एक प्रकार.
    • (अ) परकीय / विदेशी शब्द (Foreign Words)
    • (ब) स्वदेशी - भारतीय भाषेतील शब्द / परप्रांतीय भारतीय शब्द (Indian Language Words)
(अ) परकीय / विदेशी शब्द (Foreign Words)
  • या शब्दांना ऐतिहासिक संदर्भ आहेत.
  • मुसलमानांच्या सत्तेमुळे उर्दू, फारसी, अरबी भाषांचा प्रभाव मराठीवर पडला.
  • इंग्रजांच्या राजवटीत इंग्लिश भाषेचा प्रभाव मराठी भाषेवर पडला.
  • ब्रिटिशांबरोबर फ्रेंच, पोर्तुगीज, डच व्यापारी आले, त्यामुळे त्यांच्या भाषेतील शब्दही मराठीत आले.
परकीय शब्दांची उदाहरणे (Examples of Foreign Words):
  • इंग्रजी: टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, मॅडम, ऑफिस, ट्रेन, रेल्वे, बस, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पॅन्ट, बटन, व्हॉट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी.
  • पोर्तुगीज: बटाटा, तंबाखू, पगार, विजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी.
  • फारसी: खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.
  • अरबी: अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक इत्यादी.
  • परभाषेतून आलेले शब्द जसेच्या तसे नाहीत, त्यांच्या रूपात बदल झाला आहे, जो अभ्यासाचा विषय आहे.
(ब) स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द) (Indigenous Words - Indian Language Words)
  • ज्याप्रमाणे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, त्याचप्रमाणे गुजरातची गुजराती, मध्य प्रदेशची हिंदी, कर्नाटकची कानडी, आंध्र प्रदेशची तेलुगू, तामिळनाडूची तामिळ भाषा आहे.
  • मराठीच्या सीमांवर असलेल्या भाषांची देवाणघेवाण वर्षानुवर्षे चालू आहे.
  • या अन्य प्रांतीय भारतीय भाषांमधील शब्द मराठीत रूढ झाले आहेत, त्यांना स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द म्हणतात.
स्वदेशी शब्दांची उदाहरणे (Examples of Indigenous Words):
  • कानडी: अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप, कुंची, कांबळे, खलबत्ता, विळी, गुढी, कित्ती, गुंडी, शिकेकाई इत्यादी.
  • गुजराती: घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी.
  • तामिळी: चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी.
  • तेलुगू: ताळा, अनरसा, किडूकमिडूक इत्यादी.
  • हिंदी: भाई, बेटा, बच्चा, मिलाप, तपास, दिल, और, बात, दाम, करोड इत्यादी.
  • या शब्दांमुळे मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीत भर पडली आहे.
  • शब्दांचे चार प्रकार: तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय.

सिद्ध आणि साधित शब्द (Siddha and Sadhit Words)

  • भाषेचा व्यवहार सुरळीत चालण्यासाठी इतर भाषांमधून शब्द घेतले जातात.
  • भाषेच्या माध्यमातून विविध अर्थ व्यक्त करणारे शब्द तयार करावे लागतात.
  • भाषेतील शब्दांचे दोन प्रकार: सिद्ध आणि साधित.

1. सिद्ध शब्द (Siddha Words)

  • 'जा, ये, कर, वस, बोल, पी' यांसारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात, त्यांना 'सिद्ध शब्द' म्हणतात.

2. साधित शब्द (Sadhit Words)

  • 'कर' यांसारख्या सिद्ध शब्दांपासून 'करू, करून, कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार' यांसारखे शब्द बनवतात, त्यांना 'साधित शब्द' म्हणतात.
  • मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून 'साधित शब्द' बनवतात.
उपसर्ग (Prefixes)
  • उपसर्ग: मूळ शब्दाच्या आधी लागणारे अक्षर.
  • उदा. 'हर' (हरण करणे) या धातूला उपसर्ग लागल्याने होणारे बदल:
    • आ + हर = आहार (भोजन)
    • वि + हर = विहार (क्रीडा)
    • सं + हार = संहार (कत्तल)
    • प्र + हार = प्रहार (घाव)
    • परि + हार = परिहार (निवारण)
    • अप + हार = अपहार (चोरी)
    • उप + हार = उपहार (नजराणा, भेट)
    • उप + आ + हार = उपाहार (फराळ)
  • 'आ, वि, सं, प्र, परि, अप, उप' हे उपसर्ग आहेत.
  • उपसर्ग स्वतंत्रपणे येत नाहीत, ते शब्दांच्या पूर्वी लागून शब्द तयार करतात, त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात.
प्रत्यय (Suffixes)
  • प्रत्यय: शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून शब्द तयार होतात, त्यांना प्रत्यय म्हणतात.
  • उदा. जन् (जन्मणे) या धातूला प्रत्यय लागून 'जनन, जनक, जननी, जनता, जन्य' वगैरे शब्द बनतात.
  • 'न, क, ता, नी, य' हे प्रत्यय होत.
  • अशा तऱ्हेने प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना 'प्रत्ययघटित' शब्द असे म्हणतात.
  • भाषेत दोन प्रकारचे शब्द असतात: सिद्ध आणि साधित.
  • सिद्ध शब्दांचे तीन प्रकार: तत्सम, तद्भव, देशी.
  • साधित शब्दांचे दोन प्रकार: उपसर्गघटित आणि प्रत्ययघटित.
  • मराठीतील उपसर्ग व प्रत्यय तीन प्रकारचे: संस्कृत, मराठी, फारसी-अरबी.

उपसर्गघटित शब्द (Prefix-Based Words)

1. संस्कृत उपसर्ग (Sanskrit Prefixes)

  • (अर्थ कंसात)
    • अति (फार, पलीकडे): अतिशय, अत्यंत, अतिक्रम, अतिरेक, अतिप्रसंग.
    • अधि (मुख्य, श्रेष्ठ): अधिपती, अध्यक्ष, अधिकार, अधिकरण, अध्ययन, अधिदैवत.
    • अनु (मागून, सारखे): अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुवाद, अनुमती, अनुस्वार.
    • अप (विरुद्ध, हीन): अपयश, अपमान, अपकार, अपशब्द, अपशकुन, अपराध.
    • अभि (पूर्वी, जवळ): अभिनंदन, अभिमुख, अभिनय, अभ्युदय, अभिरुची, अभ्यास.
    • अव (खाली, विरुद्ध): अवतरण, अवमान, अवकृपा, अवगुण, अवनत.
    • आ (पासून, पर्यंत): आजन्म, आमरण, आक्रमण, आकर्ण, आक्रोश.
    • उत् (श्रेष्ठ, उंच): उत्कर्ष, उत्पत्ती, उन्नती, उत्तीर्ण, उद्योग, उत्तम, उत्प्रेक्षा.
    • उप (जवळ, गौण): उपवास, उपनेत्र, उपाध्यक्ष, उपप्रमुख, उपकार, उपपद.
    • दुस् (वाईट, दुष्ट): दुर्गुण, दुर्दशा, दुष्कृत्य, दुर्जन, दुर्लभ.
    • निर्, नि (बाहेर, नसलेला): निर्गत, निर्धन, निर्लज्ज, निरंतर, निकामी, निरोगी.
    • परा (उलट, परत): पराजय, पराक्रम, पराकाष्ठा, पराभव.
    • परि (पूर्ण, वाटोळा): परिपाक, परिपूर्ण, परिणाम, परिवार, परिपाठ, परिश्रम.
    • प्र (अधिक, पुढे): प्रबल, प्रगती, प्रवाह, प्रदोष, प्रकोप, प्रसिद्ध, प्रस्थान.
    • प्रति (उलट, फिरून): प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिदिन, प्रतिध्वनी, प्रत्येक, प्रतिकूल.
    • वि (विशेष, शिवाय): विख्यात, विज्ञान, विधवा, विसंगती, विपत्ती, विशेष.
    • सम् (चांगले, बरोबर): संस्कार, संस्कृत, संयोग, संगम, संगीत, संतोष, संकल्प.
    • सु (चांगले, सोपे): सुग्रास, सुभाषित, सुकर, सुगम, सुशिक्षित, सुगंध.

प्रत्ययघटित शब्द (Suffix-Based Words)

  • प्रत्यय दोन प्रकारचे असतात.
    • कृत् किंवा धातुसाधित: धातूंना जोडले जातात.
    • तद्धित किंवा नामसाधित: नामे, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना जोडले जातात.

1. कृत् प्रत्यय (Krut Suffixes)

  • धातूंना जोडले जातात, कृत्-प्रत्यय जोडल्याने जे शब्द तयार होतात, त्यांना 'कृदन्त' असे म्हणतात.
(१) संस्कृत प्रत्यय व त्यांपासून बनलेली धातुसाधिते (कृदन्ते) (Sanskrit Suffixes and Verb Derivatives)
  • अ (कर्तृवाचक): चोर, देव, सर्प, भाव, लाभ.
  • अक (कर्तृवाचक): लेखक, रक्षक, पाचक, तारक, मारक, गायक, जनक.
  • अन (साधनार्थक): नयन, चरण, वदन, नंदन, पालन.
  • आ (स्त्रीलिंगी नामे): प्रार्थना, वेदना, कल्पना, तुलना, वंदना.
  • इ-ई (क्रियावाचक नामे): इच्छा, कथा, गुहा, चिंता.
  • तृ (ता) (कर्तृवाचक): हरि (हरण करणारा), त्यागी, भाषी.
  • इक (विशेषणे): रसिक (रस घेणारा), पथिक.
  • त (भूतकालवाचक): कृत, मृत, त्यक्त, हत, नत, रत, भूत (झालेले).
  • तव्य (योग्यार्थक): कर्तव्य, श्रोतव्य, गन्तव्य, भवितव्य.
  • ति (स्त्रीलिंगी नामे): कृति, स्तुति, नीति, युक्ति, शक्ति.
  • त्रु (कर्तृवाचक): त्राता, भर्ता, श्रोता, वक्ता, दाता, नेता, शास्ता.
  • य (योग्यार्थक): कार्य (करण्यास योग्य), देय, पेय, त्याज्य, भोग्य.
  • अनीय (योग्यार्थक): श्रवणीय, मननीय, रमणीय, पूजनीय, वंदनीय.
(२) मराठी प्रत्यय (Marathi Suffixes)
  • अ (क्रियावाचक नामे): कर, डर, लूट, फूट, खोट, तूट, मेळ, फोड.
  • आ (क्रियावाचक नामे): ओढा, ठेवा, झगडा, ठेचा, वेढा, पुकारा.
  • आई (क्रियेची मजुरी): खोदाई, चराई, घडाई, उजळाई, शिलाई.
  • आऊ (योग्यतादर्शक): टाकाऊ, जळाऊ, लढाऊ, विकाऊ, शिकाऊ.
  • आरी (कर्तृवाचक): पुजारी, पिंजारी, रंगारी.
  • आळू (विशेषणे): झोपाळू, विसराळू, लाजाळू, कनवाळू.
  • ई (क्रियावाचक नामे): कढी, मोडी, उडी, बुडी, रडी, थुंकी, बोली.
  • ईक (विशेषणे): सडीक, पडीक, पढीक.
  • ईत (विशेषणे): लखलखीत, चकचकीत.
  • ईव (विशेषणे): रेखीव, जाणीव, कोरीव, घोटीव, पाळीव, आटीव.
  • ऊ (विशेषणे, नामे ): चालू, लागू, झाडू, उतारू.
  • ऊन (अव्यये): करून, देऊन, बसून, उडून, रडून, हसून.
  • खोर (विशेषणे): भांडखोर, चिडखोर.
  • णावळ (क्रियेचे मोल:) धुणावळ, लिहिणावळ, दळणावळ.
  • प (क्रियावाचक:) दळप, कांडप, वाढप.
  • पी (कर्तृवाचक:) वाढपी, दळपी, कांडपी.

2. तद्धित प्रत्यय (Taddhita Suffixes)

  • नामे, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना 'तद्धिते' म्हणतात.
  • वर दिलेले प्रत्यय हे धातूंना लागून त्यापासून नवीन शब्द तयार होतात.
  • धातूखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लावून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना शब्दसाधिते किंवा तद्धिते असे म्हणतात.
(१) संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेते तद्धित शब्द (Taddhita words formed with Sanskrit suffixes)
  • अ (अपत्यार्थक - Descendant): (यदु + अ) यादव, राघव, पांडव, भार्गव, सौभद्र
  • इक (कायिक - Related to the body): कायिक, वाचिक, मानसिक, मासिक, लौकिक, धार्मिक
  • इत (युक्तार्थक- Having): आनंदित, दुःखित, मूर्च्छित, उत्कंठित
  • ईन (युक्तार्थक- Having): कुलीन, शालीन, नवीन
  • ईय (संबध दर्शक- Relation): परकीय, राजकीय, स्वकीय
  • त्व (भाव वाचक- Abstract Noun): महत्त्व, विद्वत्व, जडत्व, मूर्खत्व, गुरूत्व
  • वान/मान (युक्तार्थक- Having): बुद्धिमान, धनवान, विद्वान, श्रीमान
(२) मराठी प्रत्यय लागून झालेले शब्दसाधिते (तद्धिते): Word derivatives (Taddhitas) made with Marathi suffixes
  • आ (नामे): वेडा, ठेवा, ठेचा, भरडा, गारठा, ओढा
  • आई (नामे): शिवाई, लढाई, विटाई, दांडगाई, शिष्टाई, खोदाई
  • ई (नामे): उडी, बुडी, बोली, चोरी, सावकारी
  • करी (नामे): शेतकरी, देणेकरी, भाडेकरी, वारकरी, पहारेकरी
  • कट (युक्तार्थक): तेलकट, मातकट, धुरकट, मळकट, पोरकट
  • की (भाववाचक): माणुसकी, उनाडकी, पाटीलकी, शेतकी, गावकी
  • वाईक (युक्तार्थक): नातेवाईक, आस्थेवाईक, तन्हेवाईक, मासलेवाईक
  • सर (सारखा): गोडसर, वेडसर, काळसर, ओलसर, भोळसर
  • णारा (कर्तृवाचक विशेषण ): लिहिणारा, बोलणारा
  • रा (युक्तदर्शक ): हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, कापरा, धावरा.
(३) फारसी प्रत्यय लागून झालेले काही तद्धित शब्द (Some Taddhita words formed with Persian suffixes)
  • गर, गार (कर्तृवाचक): सौदागर, जादूगार, जिनगर, गुन्हेगार, माहीतगार, कामगार
  • वान (राखणारा): बागवान
  • ई (भाववाचक): खुशी, मजुरी, नेकी, हमाली, फकिरी
  • स्तान (स्थानदर्शक): अरबस्तान, तुर्कस्तान, कबरस्तान
  • गिरी (भाववाचक): गुलामगिरी, मुलुखगिरी, कारागिरी
  • दार (असलेला): दुकानदार, फौजदार, जमीनदार, पोतदार, इमानदार, आबूदार, धारदार, घाटदार, डौलदार
  • दान (स्थानदर्शक): कलमदान, शामदान, अत्तरदाणी, पिकदाणी, चहादाणी
  • बाज (खेळणारा, रमणारा): दारुबाज, नखरेबाज, कुर्रेबाज, नफेबाज, दगलबाज
  • वंद (बांधणारा): नालबंद, पगडवंद, हत्यारवंद, चिरेबंद
  • खाना (ठिकाण): कारखाना, तोफखाना, दवाखाना, हत्तीखाना, दारुखाना
  • नवीस (पत्र, ग्रंथ): चिटणीस, फडनवीस, कारखाननवीस
  • णीस (स्थानदर्शक): औरंगाबाद, हैदराबाद, अहमदाबाद
  • नामा (पत्र , ग्रंथ): हुकूमनामा, करारनामा, पंचनामा, जाहीरनामा

सामासिक, अभ्यस्त शब्द (Compound, Inflected word)

आतापर्यंत आपण साधित शब्दांचे दोन प्रकार पाहिले: उपसर्गघटित व प्रत्ययघटित.
साधित शब्दांचा तिसरा प्रकार म्हणजे सामासिक शब्दांचा.

  • देवघर, पोळपाट, घरजावई, नीळकंठ, दारोदार यांसारखे जोडशब्द दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊनच बनलेले असतात.

अभ्यस्त शब्द: साधित शब्दांचा चौथा प्रकार म्हणजे अभ्यस्त शब्दांचा. घरघर, हळूहळू, शेजारीपाजारी, दगडबिगड यांसारख्या शब्दांत एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांचा अभ्यास (पुनरावृत्ती किंवा द्वित्त) होऊन हे शब्द बनलेले असतात. अभ्यस्त म्हणजे द्वित्त किंवा दुप्पट करणे.

अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार मानतात: (१) पूर्णाभ्यस्त, (२) अंशाभ्यस्त, (३) अनुकरणवाचक.

(१) पूर्णाभ्यस्त शब्द (Complete Inflected Words)

पुढील वाक्ये पाहा.

  • मदत मिळविण्यासाठी तो घर घर फिरला. (नामे)
  • जे-जे चकाकते ते ते सोने नसते. (सर्वनामे)
  • बाजारातून मी लाललाल टोमॅटो आणले. (विशेषण)
  • घेईघेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. (क्रियापद)
  • मधूनमधून असेच घराकडे येत जा. (क्रियाविशेषणे)
  • वा! वा! केव्हा आलात तुम्ही! (केवलप्रयोगी)

वरील वाक्यांत शब्दांच्या निरनिराळ्या जातींचा एकच शब्द द्विरुक्त झालेला दिसून येतो. अशा प्रकारे एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा-पुन्हा येऊन एक जोडशब्द बनतो, तेव्हा त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. आणखी काही उदाहरणे -

तिळतिळ, हालहाल, तुकडेतुकडे, कोणीकोणी, एकेक, हळूहळू, पुढेपुढे, मागोमाग, हायहाय.

पुनरुक्त व अभ्यस्त यांमधील अंतर यांच्या उच्चारण पद्धतीत दिसून येते.

जसे-

(पुनरुक्त) तो हळू हळू चालतो. (इथे कर्त्याची भावना व्यक्त होते.)

(अभ्यस्त) तो हळूहळू चालतो. (इथे क्रियेचा विशेष दर्शविला जातो.)

कित्येक वेळा या द्विरुक्त शब्दांच्या मागे च, चे, च्या, त्या अशांसारखे प्रत्यय येऊन अतिशयत्व, साकल्य सूचित केलेले असते. उदा. पैसाच पैसा, लांबचलांब, वरचेवर, वरच्यावर, वरल्यावर, मधल्यामधे, खालच्याखाली, आतल्याआत.

(२) अंशाभ्यस्त शब्द (Incomplete Inflected Words)

काही वेळा हा शब्द तसाच पुन्हा न येता त्यातील एखादे अक्षर बदलून येते. या अक्षर बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो. स्वतंत्रपणे तो वापरला जात नाही. केवळ निरर्थक अक्षरे वापरून यमक साधण्याचा प्रयत्न असतो.

उदा. शेजारीपाजारी, झाडबीड, बारीकसारीक, उरलासुरला, आडवातिडवा, अर्धामुर्धा, अघळपघळ, दगडविगड, गोडधोड, किडूकमिडूक, घरबीर, उद्याबिद्या इत्यादी.

कधी-कधी पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून द्विरुक्ती होते. उदा. कागदपत्र, कामकाज, कपडालत्ता, बाजारहाट, साजशृंगार, बाडबिस्तरा अशा शब्दांत समानार्थक शब्दांचा समास साधलेला असतो.

जसे:

  • शत्रूंची सैन्ये समोरासमोर तळ ठोकून होती. (शब्दयोगी)
  • (फारसी + फारसी) अक्कलहुशारी, डावपेच, जुलूमजबरी.
  • (फारसी + मराठी) अंमलबजावणी, कागदपत्र, खर्चवेच, मेवामिठाई, बाजारहाट इत्यादी.
  • (मराठी + फारसी) दंगामस्ती, थट्टामस्करी, धनदौलत, मानमरातब, रीतरिवाज इत्यादी.

(३) अनुकरणवाचक शब्द (Imitative Words)

काही शब्दांत एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते. उदा. बडबड, किरकीर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट, फडफड, खदखदून, तुरुतुरू, लुटूलुटू, चुटचुट, गडगड, वटवट अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द म्हणतात. स्वयंअध्ययन